आपली मते ठासून मांडण्यासाठी काही जण विध्वंसक कृतीचा हत्यार म्हणून वापर करतात ही अतिशय अस्वस्थ करणारी बाब आहे, असे मत व्यक्त करून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेवर शरसंधान केले.

अशा प्रकारच्या विध्वंसक कृतींना वाढती प्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे त्याच पद्धतीचा अवलंब करण्याचे इतरांना प्रोत्साहन मिळते ही अधिक अस्वस्थ करणारी बाब आहे. त्यामुळे अशा प्रकारची कृती करणाऱ्यांचा निषेध करावयासच हवा आणि योग्य विचार करणाऱ्यांनी अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्यांपासून चार हात दूर राहावे, असेही जेटली म्हणाले.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुंबईतील मुख्यालयावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आणि बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या प्रमुखांची बैठक उधळून लावली. त्यानंतर सायंकाळी दिल्लीत हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांनी काश्मीरमधील आमदार रशीद यांच्या तोंडाला काळे फासले त्याचा संदर्भ देऊन जेटली बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून घडणारे हे प्रकार गंभीर आहेत, त्याचा परिणाम आंतरसमाज संबंधांवर होतो तर अन्य काही जण जम्मू-काश्मीरसारख्या संवेदनक्षम विषयाला स्पर्श करतात. सोमवारी करण्यात आलेल्या हल्ल्यापूर्वी शिवसैनिकांनी भाजपचे माजी नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर शाई फेकली होती. भाजपच्या नेत्यांच्या वादग्रस्त विधानांना लगाम घालण्यास असमर्थ ठरत असल्याबद्दलही भाजप सरकारवर टीका होत आहे.

आपले मतभेद व्यक्त करण्याचे अन्य अनेक मार्ग आहेत, मतभेद व्यक्त करण्याची भारताची सुसंस्कृत परंपरा आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रश्नांवर सुसंस्कृतपणे चर्चा केली पाहिजे, असेही अर्थमंत्री म्हणाले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही पक्षाच्या अनेक खासदारांची भेट घेऊन त्यांना वादग्रस्त विधाने करण्याचे थांबवावे, अशा सूचना केल्या आहेत.