कुटुंबातील मुलींना सन्मानाची वागणूक देणे आपल्याला शिकायला हवे तसेच कुटुंबातील त्यांचे महत्व वाढवायला हवे. आपल्या मुलांना मुलींचा सन्मान करण्यासही शिकवायला हवे असे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदींनी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची सुरुवात केली.

मोदी म्हणाले, महात्मा गांधी सांगत होते की, भारताची ओळख गावांपासून आहे. आपल्याजवळ गांधीजींचे स्वप्न साकार करण्याची संधी आहे. आम्हाला गावातील लोकांचे जीवन बदलायचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी चांगल्या कामांचा संकल्प करायला हवा. गावातील एकही मुल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी प्रयत्न करा. चांगल्या कामाची इच्छाशक्ती वाढवा. ते म्हणाले, आपण लोकप्रतिनिधी सरकारचे नोकर नाही तर जनतेच्या सेवेसाठी निवडून येत असतो.

पंतप्रधान पुढे म्हणाले, जनधन, वनधन आणि गोबरधन या तीन गोष्टींद्वारे आपण ग्रामीण जीवनामध्ये एक मोठा बदल घडवून आणू शकतो. त्याचबरोबर कुटुंबामध्ये मुल्यांची जपवणूक करणेही महत्वाचे आहे. त्यासाठी आपल्याला कुटुंबात मुलींना सन्मान देणे शिकायला हवे. कुटुंबात मुलींचे महत्व वाढवा तसेच कुटुंबातील मुलांना त्यांची जबाबदारी आणि मुलींप्रती सन्मान करणे शिकवायला हवे, यासाठी सर्वांना मिळून देशात सामाजिक आंदोलन सुरु करावे लागेल.

पाण्याचे महत्व सांगताना मोदी म्हणाले, पाण्याचा एक थेंब न थेंब महत्वाचा आहे. पाणी वाया घालवणे आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे पाण्याच्या संरक्षणासाठी काय काय उपाय करावे लागतील यावर आपल्याला विचार करावा लागेल.

दरम्यान, पंतप्रधान मध्य प्रदेश दौऱ्यानिमित्त विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.