आज आपल्या अवतीभवती नजर टाकली तर बहुसंख्य लोकांच्या हातात स्मार्टफोन दिसू लागले आहेत. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत स्मार्टफोन उपलब्ध झाल्यामुळे त्याचा वापर वाढला आहे आणि या स्मार्टफोनमुळे मोबाइलवर इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येतही गेल्या काही वर्षांत विक्रमी वाढ झाली आहे. स्मार्टफोनवरील इंटरनेट वापरामुळे जून २०१४ पर्यंत देशातील इंटरनेटधारकांची संख्या तब्बल २४३ दशलक्ष (२४ कोटी) इतकी होणार आहे.
इंटरनेट अ‍ॅण्ड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) या संघटनेने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार गतवर्षांच्या तुलनेत इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या २८ टक्क्य़ांनी वाढणार असून जूनअखेपर्यंत ही संख्या २४ कोटींच्या घरात जाणार आहे. गेल्यावर्षी ही संख्या १९० दशलक्ष (१९ कोटी) इतकी होती.
२०१२ मध्ये १५० दशलक्ष (१५ कोटी) इंटरनेटधारक होते, त्यामध्ये ४२ टक्क्य़ांनी वाढ होऊन २०१३ मध्ये हा आकडा २१३ दशलक्ष (२१ कोटी) पर्यंत वाढला. यामध्ये मोबाइलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या गतवर्षी १३० दशलक्ष (१३ कोटी) इतकी होती. या पाश्र्वभूमीवर आयएएमएआयने म्हटले आहे की, स्मार्टफोनचा वापर वाढल्यामुळे मोबाइलवरील इंटरनेटचा वापर वाढला आहे. जून २०१४ पर्यंत मोबाइल इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १८५ दशलक्ष (१८ कोटी ५० लाख) इतकी होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मोबाइलवरील इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे त्याचा फायदा डिजिटल उद्योग, डिजिटल जाहिरात विश्व तसेच ई कॉमर्स क्षेत्राला अधिक होऊ लागला असल्याचेही आयएएमएआयने म्हटले आहे.
डिजिटल उद्योगाची २००७ मधील उलाढाल ८ हजार १४६ कोटी होती, तरी २०१२ मध्ये ४७ हजार ३४९ कोटी इतकी वाढली. डिसेंबर २०१३ अखेर त्यात ६२ हजार ९६७ कोटी इतकी वाढ झाली. त्याचप्रमाणे भारतातील ऑनलाइन बाजारपेठेचा विस्तारही कमालीचा वाढल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.