“आज देशाला बदनाम करण्यासाठी कारस्थान रचणारे एवढ्या खालच्या पातळीपर्यंत पोहचले आहेत की, भारतीय चहाला देखील ते सोडत नाहीत. हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, योजनाबद्धरित्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करायचं आहे. परदेशात असलेल्या काही शक्ती चहा बरोबर भारताची जी ओळख जुडलेली आहे, त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत ” असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविवार) आसाम येथील सभेत बोलताना केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज जेव्हा मी आसामच्या चहा कामगारांबाबत बोलत आहे, तेव्हा आजकाल देशाविरोधात सुरू असलेल्या षडयंत्राबाबत देखील बोलू इच्छित आहे. आज देशाला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान करणारे, एवढ्या पातळीपर्यंत पोहचले आहेत की भारताच्या चहाला देखील सोडत नाहीत. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल, हे कारस्थान रचणारे म्हणत आहेत की, भारतीय चहाच्या प्रतिमेला बदनाम करायचं आहे, योजनाबद्धरित्या भारतीय चहाच्या प्रतिमेला जगभरात बदनाम करायचं आहे. काही कागदपत्रं समोर आली आहेत ज्यावरून असं उघड होतं आहे की, परदेशात असलेल्या काही शक्ती चहा बरोबर भारताची जी ओळख जुडलेली आहे, त्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. हा हल्ला तुम्हाला मंजूर आहे का? या हल्ल्यानंतर गप्प बसणारी लोकं तुम्हाला मान्य आहेत का? हल्ले करणाऱ्यांची स्तुती करणारी लोकं तुम्हाला मान्य आहे का? प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल ज्यांनी भारतीय चहाला बदनाम करण्याचं काम हाती घेतलं आहे व त्यांच्यासाठी इथं जे गप्प बसले आहेत, त्या सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक चहा बागायतदार उत्तर मागेल. भारतीय चहा पिणारा प्रत्येक व्यक्ती उत्तर मागेल.”

तसेच “मी आसामच्या भूमीवरून या करास्थानी लोकांना सांगू इच्छित आहे. त्यांनी हवी तेवढी कारस्थानं रचावीत मात्र देश यांच्या चुकीच्या योजना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. माझा चहा कामगार ही लढाई जिंकूनच राहील. भारतीय चहावर केल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये एवढी शक्ती नाही की ते आमच्या चहा बाग कामगारांचा सामना करू शकतील.” असं देखील मोदींनी बोलून दाखवलं.

मातृभाषेत शिक्षण देणारं वैद्यकीय, तांत्रिक महाविद्यालय प्रत्येक राज्यात असावं – पंतप्रधान

आगामी काळात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दौरा करत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये पंतप्रधान मोदी अनेक योजनांचं भूमिपूजन करणार आहेत. पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे ते एका सभेला संबोधित करणार आहेत.