News Flash

राजदच्या भाजपविरोधी रॅलीत सोनिया गांधी सहभागी होणार नाहीत

सोनिया गांधी यांच्याऐवजी गुलाम नबी आझाद सहभागी होणार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (संग्रहित छायाचित्र)

बिहारच्या पाटणा शहरातील गांधी मैदानात रविवारी राष्ट्रीय जनता दलातर्फे ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’ रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत मायावतींपाठोपाठ आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधीही सहभागी होऊ शकणार नाहीत. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. सोनिया गांधी यांच्याऐवजी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे या रॅलीत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी या रॅलीला येणार की नाही हाही प्रश्न कायम आहे त्यामुळे मोठ्या जोशात पुकारलेल्या या रॅलीचे काय होणार? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

‘आजतक’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह इतर विरोधी पक्ष नेते सहभागी होणार आहेत. मात्र सोनिया गांधी या रॅलीत सहभागी होऊ शकणार नाहीत, त्याचप्रमाणे बसपाच्या नेत्या मायावती यांनीही या रॅलीत सहभागी होणार नाही असा निरोप आधीच धाडला आहे.

विरोधकांमध्ये एकजूट दिसलीच पाहिजे असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत निक्षून सांगितलं होतं. राजदची भाजपविरोधी रॅली म्हणजे विरोधकांना एकत्र येण्याची एक नामी संधीच होती. मात्र या रॅलीतून आता दोन महत्त्वाच्या व्यक्ती कमी झाल्या आहेत. सीबीआयचे छापे पडल्यानंतर तर लालूप्रसाद यादव यांनी या रॅलीची कसून तयारी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यामागे सीबीआयचा ससेमिरा जाणीवपूर्वक लावला आहे असाही आरोप त्यावेळी यादव यांनी केला होता. त्यानंतर ही रॅली लालूप्रसाद यादव यांनी प्रतिष्ठेची केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरग्रस्तांबाबत मुळीच सहानुभूती नाही तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते हवाई दौरे करत आहेत अशी टीका लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. ज्या ठिकाणी रेल्वे अपघात झाले तिथे नरेंद्र मोदी का गेले नाहीत? असाही प्रश्न लालूप्रसाद यादव यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर जदयूचे प्रवक्ते हे कुत्र्यासारखे वागत आहेत अशीही खालच्या शब्दातील टीकाही लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 23, 2017 10:01 pm

Web Title: sonia gandhi will not participate in the rjd rally
टॅग : Rally
Next Stories
1 सुरेश प्रभू यांचा राजीनामा
2 गुरमित राम रहिम यांचा २५ ऑगस्टला फैसला, पंचकुलामध्ये तणाव
3 ‘दोन हजार रूपयांची नोट बंद करण्याचा विचार नाही’
Just Now!
X