लग्न करुन फरार झालेल्या एनआरआय नवऱ्यांविरोधात समन्स, वॉरंट बजावण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय लवकरच एक वेबसाईट बनवणार आहे. या वेबसाईटवरुन बजावण्यात येणाऱ्या समन्स, नोटीसला उत्तर देणे आरोपींनी अनिवार्य असेल. जे आरोपी उत्तर देणार नाहीत त्यांना गुन्हेगार घोषित करुन त्यांची संपत्ती जप्त करण्यात येईल असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शुक्रवारी सांगितले.
अशा वेबसाईटवरुन बजावण्यात आलेले वॉरंट, समन्स जिल्हा न्यायदंडधिकाऱ्यांनी ग्राहय धरावे यासाठी गुन्हेगारी प्रक्रियेच्या नियमावलीत काही बदल करावे लागतील असे स्वराज म्हणाल्या. कायदा मंत्रालय, गृह मंत्रालय आणि महिला-बालविकास मंत्रालयाने वेबसाईटच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे असे परराष्ट्रमंत्री म्हणाल्या.
एनआरआय बरोबर लग्न केल्यानंतर नवरा बायकोला सोडून निघून गेल्याची बरीच प्रकरणे आहेत तसेच विवाहानंतर परदेशात पत्नीचा मानसिक, शारीरीक छळ केल्याचीही अनेक प्रकरणे आहेत हे असले प्रकार रोखण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून समन्स, वॉरंट बजावण्याची योजना आहे.
गेल्या तीन वर्षात एनआरआय नवऱ्याने सोडून दिल्याच्या ३३२८ तक्रारी महिलांकडून मिळाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या वेबसाईटसाठी नियमावलीमध्ये आवश्यक दुरुस्त्या पुढच्या अधिवेशनापर्यंत मंजूर करुन घेण्याचा आमचा प्रयत्न असेल असे सुषमा स्वराज म्हणाल्या. त्या एनआरआय विवाहासंबंधीच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 27, 2018 4:14 pm