याचिकेबाबत न्यायालयाचा निर्णय ७ जूनला

नवी दिल्ली : २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध अपमानास्पद उद्गार काढल्याबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर देशद्रोहाच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारीवर दिल्लीचे एक न्यायालय ७ जूनला आदेश देणार आहे.

याप्रकरणी तक्रारकर्त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी बुधवारी याप्रकरणी आदेश राखून ठेवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सैनिकांच्या रक्ताआड लपत असून त्यांच्या बलिदानाचा फायदा उचलत आहेत, अशी शेरेबाजी राहुल गांधी यांनी २०१६ साली केली होती. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी तक्रार अ‍ॅड. जोगिंदर तुली यांनी केली आहे.

आरोपीचे हे वक्तव्य लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये असमाधान पसरवणारे, तसेच पंतप्रधान व सरकार त्यांच्या बलिदानाचा फायदा करून घेत असल्याचा आणि या बलिदानाचा राजकीय लाभासाठी वापर करत असल्याचा विचार करण्यास त्यांना भाग पडणारे आहे, असे तुली यांनी या तक्रारीत म्हटले आहे. आपण ऑक्टोबर २०१६ मध्ये याबाबत तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी काही कारवाई न केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या प्रकरणात गांधी यांचा कुठलाही ‘दखलपात्र गुन्हा’ होत नसल्याचे दिल्ली पोलिसांनी १५ मे रोजी न्यायालयात दाखल केलेल्या कृती अहवालात म्हटले होते. गांधी यांनी पंतप्रधानांविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य केले असून त्यासाठी दावा दाखल केला जाऊ शकतो, असे मत त्यांनी नोंदवले होते.