अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून मार्गदर्शक अशा शब्दात गौरविण्यात आलेले भारतीय वंशाचे श्रीनिवासन गार्नर यांची अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशपदी (फेडरल जज) निवड होण्याची दाट शक्यता आहे. नियुक्तीबाबतच्या सुनावणीदरम्यान रिपब्लिकन सदस्यांनी गार्नर यांचा थेट विरोध न केल्यामुळे या पदावर प्रथमच भारतीय- अमेरिकी नागरिक असलेल्या श्रीनिवासन यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.
सिनेट न्यायिक समितीपुढे झालेल्या ९० मिनिटांच्या सुनावणीदरम्यान श्रीनिवासन यांनी उपस्थित रिपब्लिकन सदस्यांना प्रभावित केले. रिपब्लिकन सिनेटर ओर्रिन हॅच यांनी आपला श्रीनिवासन यांना ठोस पाठिंबा असल्याचे सांगितले, तर दुसरे सदस्य टेड क्रुझ यांनीही काही प्रश्न विचारून श्रीनिवासन यांच्यासोबतच्या मैत्रीचे किस्से ऐकवले.
दरम्यान, गेल्या वर्षी नावाची घोषणा करताना अध्यक्ष बराक ओबामा यांनी श्रीनिवासन यांना मार्गदर्शक म्हणून संबोधले होते. न्यायाधीशपदावरून श्रीनिवासन अतिशय चांगली कामगिरी करतील, असा विश्वासही ओबामा यांनी व्यक्त केला होता.