इराणचा सैन्याधिकारी जनरल कासीम सुलेमानी याला निष्पाप लोकांचे जीव घेण्यात आसुरी आनंद मिळत होता; तसेच नवी दिल्ली आणि लंडन इतक्या लांबवरच्या दहशतवादी हल्ल्यांच्या योजनांमध्येही त्याचा सहभाग होता, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

रिव्हॉल्युशनरी गार्ड्सच्या या शक्तिशाली कमांडरला इराकमध्ये ठार मारण्यात आल्याच्या दुसऱ्या दिवशी ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले.

नवी दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यात सुलेमानी सहभागी होता असे सांगून, ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराणच्या भौगोलिक व राजकीय भांडणात भारतालाही ओढण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. मध्यपूर्व भागाला अस्थिर करण्यासाठी दहशतवादी कृत्ये करण्याचे काम सुलेमानी करत होता, असे त्याला ठार केल्यानंतर दिलेल्या पहिल्या प्रतिक्रियेत ट्रम्प म्हणाले.

अमेरिकी नागरिकांना ठार करणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांसह इराकमधील अमेरिकी लक्ष्यांवर अलीकडेच झालेले हल्ले,  बगदादमधील  दूतावासावरील  हल्ला हे सर्व सुलेमानीच्या निर्देशावरून झाले, असे ट्रम्प यांनी फ्लोरिडातील रिसॉर्टमध्ये पत्रकारांना सांगितले.

नवी दिल्लीतील बाँम्बहल्ल्याचा संदर्भ

नवी दिल्लीतील एका इस्रायली राजनैतिक अधिकाऱ्याची पत्नी तिच्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी जात असताना, तिच्या मोटारीवर १३ फेब्रुवारी २०१३रोजी बॉम्बहल्ला करण्यात आला होता. या घटनेत कुणीही ठार झाले नव्हते. इस्रायलने इराणी शास्त्रज्ञांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी थायलंड व जॉर्जियातील इस्रालयींवर जे साखळी बॉम्बहल्ले करण्यात आले, त्याचाच हा एक भाग असल्याचे नंतर मानले गेले. हा हल्ला करणाऱ्यांचा सुलेमानीच्या नेतृत्वाखालील इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड्सशी संबंध असल्याचा निष्कर्ष दिल्ली पोलिसांनीही तपासाअंती काढला होता. भारतानेही इराणला अशा घटनांबाबत इशारा दिला होता.