लैंगिक शोषण प्रकरणात आसाराम बापूचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे.  अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण आणि बलात्कार केल्याचा आरोप आसाराम बापूवर आहे. सुरत येथील न्यायालयाने आसारामचा मुलगा नारायण साई याला बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर लैंगिक शोषणप्रकरणात आसाराम बापूची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे . दरम्यान या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी आसाराम बापूने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने आसाराम बापूला दिलासा न देता त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू उर्फ अशुंमल शिरमलानीला अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये आसारामबापूला इंदूर येथील आश्रमातून अटक करण्यात आली होती. आसारामचा मुलगा नारायण साईवरही बलात्काराचे आरोप आहेत त्यालाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ऑगस्ट २०१३ मध्ये आसाराम बापूने जोधपूरच्या आश्रमात सोळा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप झाला. भूतप्रेताच्या तावडीतून सुटका करण्याच्या बहाण्याने आसारामने लैंगिक छळ केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला. त्यानंतर इतरही काही प्रकरणं बाहेर आली होती. ज्यानंतर सप्टेंबर महिन्यात या प्रकरणी आसाराम बापूला अटक करण्यात आली. आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई दोघेही बलात्कार आणि लैंगिक छळ प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आसारामने सुप्रीम कोर्टात जो जामीन अर्ज केला होता तो सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे.