आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी जाहीर केला. त्यानंतर त्यांच्या या निर्णयावर आता काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा स्वराज या स्मार्ट असून मध्य प्रदेशात भाजपाची स्थिती खराब असल्याने त्यांनी मैदान सोडून दिल्याचे त्यांनी ट्विटरवरुन म्हटले आहे.

मात्र, त्यानंतर केलेल्या दुसऱ्या एका ट्विटमधून चिदंबरम यांनी सुषमा स्वराज यांच्या कामाचे कौतुकही केले असून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली. ते म्हणाले, श्रीमती सुषमा स्वराज यांनी देशाची विनम्रतेने सेवा केली आहे. त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.

दरम्यान, सुषमा स्वराज यांनी २०१९ची निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील भावनिक प्रतिक्रिया दिली होती. थरुर म्हणाले, संसदेत परराष्ट्र मंत्र्याच्या रुपात मी त्यांना कायम चांगली व्यक्ती म्हणून पाहिले आहे.

सुषमा स्वराज या विदिशा मतदारसंघाच्या खासदार आहेत. बऱ्याच काळापासून त्यांची प्रकृती ठीक नाही. दरम्यान, बऱ्याच वेळा त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मोदी सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री या नात्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे कायम बोलले जाते.