केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी आपल्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देणारा एक  फोटो ट्विटरवरुन शेअर केला आहे. सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांच्या लग्नाचा आज वाढदिवस होता. केंद्रीय मंत्रीमंडळात आपली छाप उमटविणाऱ्या  सुषमा स्वराज यांनी तरुणाईतील पतीसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये  नथ आणि बिंदीया घातल्याचे दिसत आहे.  सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांनी मिझोरामचे राज्यपाल म्हणून कारभार पाहिला आहे. स्वराज कौशल वरिष्ठ वकिल असून वयाच्या ३७ व्या वर्षी राज्यपाल पदाची भूमिका बजावणारे सर्वात तरुण भारतीय राज्यपाल आहेत. १३ जुलै  १९७५ मध्ये सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह थाटला होता.  सुषमा स्वराज १९७७ मध्ये हरियाणामधून  वयाच्या २५ व्या वर्षी निवडूण आल्या होत्या. यावेळी त्यांनी सर्वात कमी वयात कॅबिनेट मंत्री पद भुषविण्याचा मान मिळविला. समाज माध्यमातून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शेअर केलेल्या लग्नाच्या आठवणींना लोकप्रियता मिळत असून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला भरभरुन शुभेच्छा मिळाल्याआहेत. सुषमा स्वराज आणि स्वराज यांना एक मुलगी असून ती सुद्धा कायद्याचे शिक्षण घेवून वकिल म्हणून कार्यरत आहे.