तामिळनाडूमध्ये येत्या ६ एप्रिल रोजी मतदान होणार असून त्याआधी राज्यात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. मतदानाच्या काही दिवस आधी प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्यातच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील प्रचारसभांमधून काँग्रेस, द्रमुकवर जोरदार प्रहार केला आहे. धारापुरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या प्रचारसभेमध्ये या दोन्ही पक्षांवर जोरदार टीका केली. “महिलांचा अपमान करणं ही काँग्रेस, द्रमुकची संस्कृती आहे. त्यांनी जुनं टूजी मिसाईल डागलं असून त्याला फक्त एकच लक्ष्य आहे, तमिळनाडूच्या महिलांचा अपमान करणं”, असं मोदी म्हणाले आहेत.

ए. राजा यांच्या विधानावर रडले होते मुख्यमंत्री!

काही दिवसांपूर्वी द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात द्रमुकचे नेते आणि देशाचे माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्याविषयी आक्षपार्ह वक्तव्य केलं होतं. “स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे. पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल आहेत”, असं ए. राजा म्हणाले होते. रविवारी झालेल्या एका प्रचारसभेत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी या टीकेवर भावनिक होत भाषण देखील केलं होतं. त्या मुद्द्यावरून आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांचे अश्रू आणि द्रमुक नेत्याचा माफीनामा! तमिळनाडू निवडणुकीत घडतंय काय?

दिंडिगल लिओनींच्या वक्तव्याचं काय झालं?

“काही दिवसांपूर्वी द्रमुकचे एक नेते दिंडिगल लिओनी यांनी महिलांबद्दल गंभीर वक्तव्य केलं होतं. द्रमुकने त्यांना थांबवण्यासाठी काहीही केलं नाही. आता युपीएनं त्यांचं जुनं टूजी मिसाईल डागलं आहे. तामिळनाडूच्या नारीशक्तीवर हल्ला करण्याचं टार्गेट या मिसाईलला दिलं आहे. देव न करो, जर ते सत्ते आले, तर ते तामिळनाडूच्या अनेक महिलांचा अपमान करतील”, असं पंतप्रधान म्हणाले आहेत.

ए. राजा यांच्याप्रमाणेच दिंडिगल लिओनी यांनी देखील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. “परदेशी गायींचं दूध प्यायल्याने आपल्याकडच्या महिला ड्रमसारख्या जाड झाल्या आहेत. आधी त्यांचा आकार 8 आकड्यासारखा होता”, असं ते म्हणाले होते. त्यावरून देखील मोठा वाद निर्माण झाला होता.

“परदेशी गायींचं दूध प्यायल्यानेच आपल्याकडच्या महिला…”, द्रमुकच्या नेत्याचं वादग्रस्त विधान!