Kerala floods. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे सध्या जवळपास संपूर्ण राज्य प्रभावित झालं असून, बचावकार्याने वेग धरला आहे. अनेकांनीच आपल्या परिने या बचावकार्यात योगदान देण्यास सुरुवात केली आहे. आयएएस अधिकारी म्हणू नका किंवा मग सर्वसामान्य नागरिक, प्रत्येकजण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावत आहे. त्यातच आता केरळमधील टेलिकॉम कंपन्याही पुढे आल्या आहेत.

पुढील सात दिवस केरळमध्ये दुरध्वनी सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी या फोन कॉल आणि मोबाईल डाटा वापर विनामुल्य करण्याचं ठरवण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. रिलायन्स जिओ आणि बीएसएनएलकडूनही मोफत टेलिफोन सेवा पुरवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय वोडाफोन, भारती एअरटेल, आयडिया सेल्युलर यांच्यातर्फेही पुढचे सात दिवस दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देण्यात आल्या आहेत.

या दुर्दैवी प्रसंगात आम्ही ग्राहकांच्या सोबत आहोत. तुमच्या आप्तजनांच्या संपर्कात राहण्यासाठी आम्ही पुढील सात दिवस मोबाईल डाटा आणि दुरध्वनी सेवांमध्ये काही महत्त्वाच्या सवलती देत आहोत’, असा संदेश जिओतर्फे त्यांच्या केरळमधील ग्राहकांना पाठवण्यात येत आहे.

वाचा : निपाहमुळे जीव गमावणाऱ्या नर्सच्या पतीची माणूसकी, पहिला पगार पूरग्रस्तांना

बीएसएनएलतर्फेही व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी केरळातील परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. ‘केरळमधील ग्राहकांना या अडचणीच्या वेळी साथ देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. पुढील सात दिवस आम्ही पुरग्रस्त भागांमध्ये असणाऱ्यांसाठी मोफत दुरध्वनी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ते म्हणाले.

फक्त संपर्क साधण्यासाठीच नव्हे तर इतरही विविध मार्गांनी या टेलिकॉम कंपन्यांनी केरळमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. त्रिसूर, कालिकत, मलाप्पुरम, कन्नूर, कोट्टायम या भागांमध्ये मोबाईल चार्ज करण्यासाठीही एअरटेलकडून काही उपाय योजण्यात आले आहेत.

वाचा : Kerala floods: पूरग्रस्तांच्या मदतीस आएएस अधिकारी आले धावून; कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचं सोशल मीडियावर कौतुक

दरम्यान, केरळमध्ये मुसळधार पावसामुळे महापूरसदृश स्थिती असून गुरुवारी या पुराने आणखी ३० बळी घेतले. सध्या या पुरामुळे मृतांची एकूण संख्या आता १६४ वर पोहोचली आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत तब्बल आठ हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे नुकसान तसेच जीवितहानी आणखी वाढण्याची भीती आहे.