संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या बोधगया या बौद्ध धर्मस्थळाला रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. कमी तीव्रतेच्या किमान नऊ बॉम्बस्फोटांनी महाबोधी मंदिर व आजूबाजूचा परिसर हादरला. या हल्ल्यात दोन बौद्ध भिख्खू जखमी झाले आहेत. इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवल्याचा संशय आहे. मात्र, अद्याप कोणीही या स्फोटांची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
महाबोधी मंदिराच्या परिसरात नऊ बॉम्बस्फोट झाले तर बाहेरच्या भागात आढळलेले तीन बॉम्ब निकामी करण्यात आले. पहाटेच्या सुमारास हे स्फोट झाल्याने त्यात फारशी जिवितहानी झाली नाही. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून हा दहशतवादी हल्लाच होता, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
गौतम बुद्ध यांना ज्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या बोधीवृक्षाला तसेच याठिकाणी असलेल्या बुद्धाच्या ८० फुट उंच मूर्तीलाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. मात्र, त्याला अजिबात नुकसान झाले नाही. म्यानमारमधील मुस्लिमांवर झालेल्या अत्याचाराविरोधात इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी भारतातील बौद्ध धार्मिक स्थळांना ‘लक्ष्य’ करतील, असा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी न घेतल्याने रविवारी दहशतवादी यशस्वी ठरले, असा सूर उमटत आहे.