फेसबुकच्या द्वेषमूलक पोस्टबाबतच्या नियमांचा मुद्दा संसदेच्या माहिती तंत्रज्ञानविषयक स्थायी समितीपुढे नेण्याच्या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या वक्तव्याबद्दल समाजमाध्यमावरील वादानंतर, थरूर व भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी एकमेकांविरुद्ध हक्कभंग कार्यवाहीची मागणी केली आहे. थरूर हे या समितीचे अध्यक्ष, तर दुबे हे तिचे सचिव आहेत.

फेसबुकच्या कथित ‘गैरवर्तणुकीबाबत’ चर्चा करण्यासाठी समितीची बैठक बोलावण्याच्या आपल्या निर्णयावर दुबे यांनी समाजमाध्यमावर ‘अपमानास्पद शेरेबाजी’ केली, असा आरोप थरूर यांनी लोकसभेचे अधय्क्ष ओम बिर्ला यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. ‘अ‍ॅजेंडय़ाबाबत समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही करण्याचा स्थायी समितीच्या अध्यक्षांना अधिकार नाही’, या दुबे यांच्या ट्विटरवरील वक्तव्यालाही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

दुबे यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. समितीच्या सदस्यांशी विचारविनिमय केल्याशिवाय कुठलीही व्यक्ती किंवा संस्था यांना समितीपुढे बोलावण्याचा थरूर यांना काहीही अधिकार नाही, असे त्यांनी अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. एखाद्या संसदीय समितीच्या कुठल्याही बैठकीचा अ‍ॅजेंडा त्या समितीच्या सर्व सदस्यांशी चर्चा केल्यानंतरच ठरवला जातो, असे त्यांनी नमूद केले आहे. मात्र, फेसबुक किंवा व्हॉट्सअ‍ॅप यांना पाचारण करण्याच्या विषयाबाबत थरूर यांनी समितीच्या कुठल्याही बैठकीत चर्चा केली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.