राज्यात सत्ता स्थापनेचे नवे समीकरण तयार झाले असून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाशिवआघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यानंतर आता शपथविधीसाठी १७ नोव्हेंबर हा मुहूर्त ठरवला जाऊ शकतो. कारण, याच दिवशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. या दिवशी जर शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर चांगलीच गोष्ट असेल असे मत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

केसरकर म्हणाले, शिवसेनेसाठी महत्वाचे ठिकाण असलेल्या शिवतीर्थावर शपथविधीचा कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला जर शपथविधी झाला तर ही चांगलीच गोष्ट आहे. मात्र, सत्तास्थापनेसाठी आधीच उशीर झाला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी ताटकळत बसला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा लवकरात लवकर सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न असेल.