कल्पनेपेक्षा संख्येने तीन पटींनी अधिक असलेले पृथ्वीसारखे  मोठे वसाहतयोग्य ग्रह अस्तित्वात असल्याचा दावा भारतीय वंशाच्या एका वैज्ञानिकाने केला आहे. यातील काही ग्रह हे जवळच्याच ताऱ्यांभोवती फिरत असल्याचा दावा पेनस्टेट विद्यापीठातील डॉक्टरेटचे विद्यार्थी असलेल्या रवी कोपारापू यांनी केला आहे. आपल्या जवळचे दहा तारे गृहीत धरले तर त्यांच्याभोवती किमान चार वसाहतयोग्य ग्रह फिरत आहेत, असे सांगून ते म्हणाले की, हा एक अंदाज आहे. कदाचित यापेक्षा जास्त वसाहतयोग्य ग्रह असू शकतील. कमी वस्तुमानाच्या शीत ताऱ्यांभोवती किंवा एमड्वार्फ (बटू तारे) फिरणारे हे पृथ्वीसारखे ग्रह आहेत. त्यांचे पृथ्वीपासूनचे अंतर सात प्रकाशवर्षे असून आतापर्यंतच्या अंदाजापेक्षा हे निम्मेच अंतर आहे. दहा प्रकाशवर्षे अंतरावर किमान आठ शीत तारे असून पृथ्वीच्या आकाराचे तीन वसाहतयोग्य ग्रह सहजपणे तिथे आहेत. हार्वर्ड -स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेच्या वैज्ञानिकांनी ३९८७ एम ड्वार्फ ताऱ्यांचे विश्लेषण केले असून पृथ्वीसारखे ग्रह शोधणे हा त्यामागचा प्रमुख हेतू होता.
कोपारप्पू यांनी त्यानंतर केलेल्या संशोधनात असे दिसून आले की, केप्लर उपग्रहाने गोळा केलेल्या माहितीनुसार केलेल्या या संशोधनात पृथ्वीसारखे आणखी ग्रह असल्याची शक्यता वाढली आहे. कोपारप्पू व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाणी व कार्बन शोषणाच्या माहितीआधारे या वसाहतयोग्य ग्रहांच्या शक्यतेबाबत नवे प्रारूप मांडले आहे. पूर्वी कल्पिल्यापेक्षा पृथ्वीच्या आकाराच्या या ग्रहांची संख्या तीनपटींनी अधिक आहे. याचा अर्थ पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत, त्यामुळे परग्रहांवरील जीवसृष्टी सापडण्याच्या शक्यतेतही वाढ झाली आहे असे  कोपारप्पु यांनी सांगितले. ‘जर्नल अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.