पं. जवाहरलाल नेहरू यांच्या वारशावरून निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. पं. नेहरू यांचे नाव इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने नेहरूंवरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याच्या मार्गात प्रत्येक पावलावर अनेक अडथळे आणल्याचा आरोपही गांधी यांनी केला.
पं. जवाहरलाल नेहरू यांच्या संकल्पनेतील लोकशाही, सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरण आजमितीलाही कालसुसंगत आहेत, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पं. नेहरू यांच्या संकल्पना आणि राजकारण  चिरंतन आहे, असेही ते म्हणाले. पं. नेहरू यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, नेहरूंच्या संकल्पनांना सध्या आव्हान दिले जात आहे. त्यामुळे नेहरूंनी काय उभारले त्यालाच चिकटून न राहता आपण लोकशाही, धर्मनिरपेक्षता मजबूत करण्यासाठी लढले पाहिजे, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
या परिषदेला २० देशांचे, २९ राजकीय पक्षांचे आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. घानाचे माजी अध्यक्ष जॉन कुफोर यांनी या परिषदेतील ठराव वाचून दाखविला.मानवतेचे प्रतिनिधी म्हणून नेहरूंच्या मूल्यांचे जतन करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या दृष्टिकोनाचा पाठपुरावा करू या आणि जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू या, असे ठरावात म्हटले आहे.