आम्ही या देशाचे असून देश आमचा आहे, अशा शब्दांत पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना खडसावले. त्याच वेळी देशात सहिष्णुता असल्याचे मत व्यक्त करताना त्यांनी पाकिस्तान-सीरियासारख्या देशांत तर तोंडही न उघडता येण्यासारखी परिस्थिती असल्याचे लोकसभेत सांगितले. देशात सहिष्णुता असून शास्त्रज्ञ, लेखक आणि इतिहासकारांची पुरस्कारवापसी याचेच निदर्शक असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या की, भारतीय मुस्लीम खऱ्याखुऱ्या इस्लामचे पालन करतात. कारण, येथील हिंदू बहुसंख्याक सहिष्णू आहेत. सहिष्णुतेचे तत्त्व बाबासाहेबांनी हिंदू धर्मातूनच घेतले असावे. शास्त्रज्ञ, लेखक आणि इतिहासकारांनी पुरस्कारवापसीच्या रूपाने अंगीकारलेला निषेधाचा मार्गच देशाला जिवंत ठेवतो आहे.