पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटबंदीनंतर देशभरातील लोक जुन्या नोटा बदलून घेत आहेत. बँकेत नोटा जमा करण्यासाठी लोकांनी बँकेबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. दरम्यान सूरतमधील उद्योगपती लालजीभाई पटेल यांनी तब्बल सहा हजार कोटींची रोख रक्कम बँक खात्यामध्ये जमा केल्याची चर्चा होती. मात्र हे वृत्त चुकीचे असल्याची माहिती खुद्द लालजीभाई यांनी दिली आहे.

सूरतस्थित हिरे व्यापारी लालजीभाई पटेल यांनी सहा हजार कोटी रुपये बँकेत जमा केल्याची माहिती समाज माध्यमांवर फिरते आहे. अनेकांनी समाज माध्यमांमधील ही माहिती मोठ्या प्रमाणात शेअर केली आहे. मात्र या वृत्त्ताचा लालजीभाई पटेल यांनी इन्कार केला आहे. ‘मी हिऱ्यांचा व्यापारी आहे. याशिवाय मी आयात-निर्यातीच्या व्यापारातदेखील सक्रीय आहे. मात्र सहा हजार कोटी रुपयांची रोकड बँकेत जमा केल्याची माहिती चुकीची आहे,’ असे लालजीभाई यांनी म्हटले आहे.

मध्यंतरी पंतप्रघान नरेंद्र मोदींचा कोट ४ कोटी रुपयांना विकत घेतल्याने लालजीभाई पटेल चर्चेत आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. लोकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या नोटा ३१ डिसेंबरपर्यंत बँकेतून बदलून घ्याव्यात, असे आवाहन मोदींकडून करण्यात आले होते. यानंतर उद्योगपती लालजीभाई पटेल यांनी तब्बल सहा हजार कोटी रुपये बँकेत जमा केल्याची चर्चा होती. यावरुन पंतप्रधान मोदी आणि लालजीभाई पटेल यांच्या अभिनंदनाचे संदेश समाज माध्यमांवरुन फिरत होते. मात्र आता खुद्द लालजीभाई पटेल यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

लालजीभाई पटेल सेवाभावी आणि समाजपयोगी कार्यासाठी ओळखले जातात. या वर्षाच्या सुरुवातीला पटेल यांनी देशातील मुलींच्या शिक्षणासाठी २०० कोटींची रक्कम दिली होती. याशिवाय लालजीभाई पटेल त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीत बोनस म्हणून गाड्या आणि फ्लॅटदेखील देतात.

जुन्या नोटा बदलून घेताना सामान्य माणसाला मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ३१ डिसेंबरला नोटा बदलून घेण्याची मुदत संपणार आहे. या मुदतीनंतर जुन्या नोटांना काहीही किंमत राहणार नाही. त्यामुळे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांसमोर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात जमा करणाऱ्यांवर आणि संशयास्पद व्यवहारांवर सरकारची करडी नजर असणार आहे. अंमलबजावणी संचलनालय आणि आयकर विभागाकडून संशयास्पद देवाणघेवाणींची चौकशी करण्यात येणार आहे.