अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या आदिवासी पट्टय़ातील दहशतवाद्यांच्या तळावर पाकिस्तानने सोमवारी प्रथमच देशी बनावटीच्या ड्रोनने केलेल्या हल्ल्यात तीन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.
उत्तर वझिरिस्तानातील शावाल परिसरात बराक या ड्रोनने केलेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांचा छुपा अड्डा उद्ध्वस्त झाला. देशी बनावटीच्या ड्रोनने केलेल्या हल्ल्यात शावाल खोऱ्यातील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त झाला आणि त्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले, असे लष्कराचे प्रवक्ते मेजर जन. आसिम बाजवा यांनी ट्विट केले.
रिमोटच्या सहायाने उडविण्यात येणारे बराक ड्रोन आणि बर्क क्षेपणास्त्र यांची १४ मार्च रोजी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे अमेरिकेकडून ड्रोनची मागणी करणारा पाकिस्तान सदर तंत्रज्ञान मिळविण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे गेला आहे.
अफगाणिस्तानच्या सीमेवर अल-कायदा आणि अन्य सशस्त्र गटांचे तळ असून पाकिस्तानच्या लष्कराने त्यांच्याविरुद्ध वर्षभर कारवाई सुरू केली आहे. अमेरिकेच्या वैमानिकरहित ड्रोनने आदिवासी पट्टय़ात शेकडो जणांना ठार केल्याने देशात संतापाची लाट पसरली होती. पाकिस्तानने ड्रोन हल्ल्यांना विरोध केला होता.