दंडकारण्य विशेष क्षेत्र समितीचा प्रवक्ता आणि एक प्रमुख नक्षलवादी गुमुदावेल्ली वेंकटकृष्ण प्रसाद ऊर्फ गुडसा उसेंडी (५३) याने बुधवारी पत्नीसह आंध्र प्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. वारणगळ जिल्ह्य़ातील कादिवेंडी गावाचा मूळ रहिवासी असलेल्या प्रसाद याने नक्षलवादविरोधी विशेष गुप्तचर शाखेसमोर आत्मसमर्पण केले. मात्र त्याने आत्मसमर्पण केल्याच्या अथवा त्याला अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला गुप्तचर शाखेकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. प्रसाद याच्यावर २० लख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
माओवादी पक्षांत विविध पदांवर काम केल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून प्रसाद हा प्रवक्ता म्हणून काम करीत होता. छत्तीसगडमधील बस्तर येथे काँग्रेसच्या नेत्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यात २७ जण ठार झाले होते. सदर हल्ला आणि अन्य कारवाया प्रसाद याच्या देखरेखीखाली होत होत्या. त्यामुळे त्याने आत्मसमर्पण करणे हा नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रसाद याने वारणगळमधील घर सोडले आणि तो गेल्या ३० वर्षांपासून छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील जंगलात दडून बसला होता. मीडिया आणि राजकीय नेत्यांपर्यंत संदेश पोहोचविण्यासाठी प्रसाद बनावट ‘आयपी अ‍ॅडेस’चा वापर करण्यात तरबेज होता. बस्तरमधील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारा संदेशही त्यानेच पाठविला होता. त्याला ‘फॅण्टम’ या टोपणनावाने ओळखले जात होते. भाकपच्या (माओवादी) विचारवंतांच्या यादीत त्याचे स्थान अग्रभागी होते. पक्षाच्या कामगिरीबाबतचे विश्लेषण करणे, रणनीतीवर लेख लिहिणे ही कामेही तो जबाबदारीने पार पाडत असे. गरज नाही तेथे नक्षलवाद्यांकडून हिंसाचाराचा अतिरेक झाल्यास तो त्यावरही आसूड ओढत असे. एम.कोटेश्वर राव या पश्चिम बंगालमध्ये पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर प्रसाद याला अधिक महत्त्व प्राप्त झाले होते.