टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) मोबाइल धारकांना नको असलेल्या म्हणजेच त्रासदायक ठरणाऱ्या कॉल आणि एसएमएसच्या कटकटीपासून सूटका करण्याची तयारी केली आहे. यासंबंधी नवे नियम ट्रायने गुरूवारी जारी केले. यामध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय अशाप्रकारच्या कॉल आणि एसएमएसवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच मार्केटिंगशी निगडीत कॉल आणि एसएमएस केवळ नोंदणीकृत संस्थेकडूनच पाठवले जातील याची दक्षता घेण्याचे आदेश टेलीकॉम कंपन्यांना ट्रायने दिले आहेत. नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद करण्यात आली असून १ हजार रुपयांपासून ५० लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

नियम बदलणं गरजेचं झालं होतं, असं ट्रायने गुरूवारी सांगितलं. नवे नियम बनवण्याचा हेतू स्पॅम कॉल्समुळे होणाऱ्या त्रासापासून ग्राहकांची सूटका करणं हा आहे. नव्या नियमांतर्गत मेसेज सेंडर्स (मेसेज पाठवणारे) आणि हेडर्स (वेगवेगळ्या पद्धतीच्या मेसेजेसचे वर्गीकरण करणारे) यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आलं आहे , तसंच हे मेसेज पाठवण्याआधी ग्राहकांची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

सद्यस्थितीला अनेक कंपन्या नियमांचं उल्लंघन करतात, पण नव्या नियमांमध्ये ग्राहकांकडे पूर्ण नियंत्रण असेल. अशाप्रकारच्या कॉल्स अथवा मेसेजला ग्राहकांना जर आधी परवानगी दिली असेल तरी नंतर परवानगी रद्द करण्याचा अधिकारही ग्राहकांना असेल. ग्राहकांच्या परवानगीमुळे नियमांचं उल्लंघन थांबेल असं ट्रायकडून सांगण्यात आलं.