जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथील पांथा चौक येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक तासांपासून सुरू असलेली चकमक अखेर थांबली आहे. सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. रविवारी ३.४० वाजता सुरू झालेल्या या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. तत्पूर्वी शुक्रवारी दहशतवाद्यांनी याच जागी केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) टीमवर हल्ला केला होता. यामध्ये दोन जवान शहीद झाले होते. चकमकीनंतर सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले.

शुक्रवारी सांयकाळी सीआरपीएफच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर दहशतवादी डीपीएस श्रीनगरकडे पळाले होते. सुरक्षादलाने नंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून सर्च ऑपरेशन राबवले होते. याचदरम्यान काही स्थानिक लोकांनी सुरक्षा दलांवर दगडफेकही केली. त्यामुळे सर्च ऑपरेशनमध्ये अडथळा आला होता.

सीआरपीएफचे महानिरीक्षक रविदीप साही म्हणाले की, दहशतवाद्यांनी एके ४७ रायफल्सने शनिवारी सांयकाळी ५.४५ च्या सुमारास सीआरपीएफच्या गस्ती वाहनावर हल्ला केला. दोन दहशतवादी डीपीएस शाळेकडून आले आणि सीआरपीएफच्या वाहनावर गोळीबार सुरू केला. त्यावेळी हे वाहन यू टर्न घेत होते. सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर सुरक्षादलांवर दगडफफेक करण्यात आली.