जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथील वाघमा परिसरात स्थानिक पोलिसांसह लष्कराचे जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू झाली आहे. आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

परिसरात अद्यापही चकमक सुरू असून, संपूर्ण परिसरास जवानांनी वेढा दिलेला आहे. शिवाय, शोधमोहीम देखील राबवली जात आहे. या परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवनांना मिळाली होती.

तीन दिवसांपूर्वी बिजबेहरा येथे सीआरपीएफच्या जवानासह एका पाच वर्षांच्या मुलाची हत्या करणाऱ्या, दोन दहशतवाद्यांचा आज वाघमा येथे झालेल्या चकमकीत खात्मा करण्यात आला आहे. अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे डीजी दिलबाग सिंग यांनी दिली आहे.

या अगोदर सोमवारी लष्करी जवान व जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अनंतनाग जिल्ह्यातील खुलचोहर भागात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करत, डोडो जिल्हा दहशतवाद मुक्त म्हणून घोषित केला होता.

दरम्यान दक्षिण काश्मीरमध्ये २९ विदेशी दहशतवादी कार्यरत असल्याचं जम्मू- काश्मीर पोलिसांनी शनिवारी सांगितलं होतं. मात्र, त्यांचा सामना करण्याचा आणि या संपूर्ण भागातून दहशतवाद निपटून काढण्याचा सुरक्षा दलांना पुरेसा अनुभव आहे, हेही त्यांनी आवर्जून नमूद केलं आहे.