24 November 2017

News Flash

हेलिकॉप्टर खरेदी चौकशीत ब्रिटनचे मदतीचे आश्वासन

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँडसोबत झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात भारताकडून होत असलेल्या चौकशीत सर्वतोपरी मदत करण्याची

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: February 20, 2013 3:08 AM

इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँडसोबत झालेल्या हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात भारताकडून होत असलेल्या चौकशीत सर्वतोपरी मदत करण्याची तयारी ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दर्शविली आहे. ३६०० कोटींच्या हेलिकॉप्टर खरेदी सौद्यात ३६२ कोटींची लाचखोरी आरोपांमुळे वातावरण तापले असताना आज दिल्लीत कॅमेरून यांचे आगमन झाले. या सौद्यात झालेल्या लाचखोरीच्या आरोपांविषयी  कॅमेरून यांच्यापाशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती.
ऑगस्टा वेस्टलँडविषयी भारताने माहिती मागितल्यास प्रतिसाद देऊ, असे कॅमेरून यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ब्रिटनने लाचखोरीविरोधात केलेला कायदा जगात सर्वात प्रभावी असल्याचा दावा कॅमेरून यांनी केला. मात्र, कॅमेरून यांनी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे कौतुकही केले. या कंपनीचे कामगार कौशल्यवान असून उत्तम हेलिकॉप्टर बनवितात, अशी त्यांनी प्रशंसा केली. गंभीर स्वरूपाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ब्रिटनमध्ये स्वतंत्र तपास यंत्रणा असून ऑगस्टा वेस्टलँडच्या लाचखोरीची चौकशी करायची की नाही, याचा निर्णय ही तपास संस्था घेईल, असे त्यांनी सांगितले. तीन दिवसांच्या व्यापार दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज कॅमेरून यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची १० जनपथ येथे जाऊन भेट घेतली.
ऑगस्टा वेस्टलँड कंपनीने २०१० साली भारताला हेलिकॉप्टर विकताना अनैतिक पद्धतींचा वापर केल्याच्या आरोपांकडे कॅमेरून यांचे लक्ष वेधून मनमोहन सिंग यांनी या प्रकरणी ब्रिटनने भारताची मदत करावी, अशी विनंती केली. ऑगस्टा वेस्टलँड ही इटलीच्या फिनमेक्कानिका कंपनीची उपकंपनी असली तरी तिचे तीन हजारांहून अधिक कर्मचारी ब्रिटनच्या सॉमरसेटमध्ये काम करतात. २०१५ पर्यंत भारतासोबत एकूण व्यापारी उलाढाल दुप्पट करण्याचे म्हणजे २३ अब्ज पौंडांवर नेण्याचे लक्ष्य गाठले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सायबर हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी तसेच ऑनलाइन सुरक्षेत संशोधन आणि प्रशिक्षणविषयक देवाणघेवाणीच्या बाबतीत अधिक सहकार्य करण्यावर कॅमेरून आणि मनमोहन सिंग यांनी सहमती दर्शविली.

First Published on February 20, 2013 3:08 am

Web Title: uk assures to help in chopper scam probe
टॅग Chopper Scam