ब्रिटनमध्ये करोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची चिन्ह दिसत असून रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोना व्हायरसची दुसरी लाट रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी लोकांना ‘शक्य असेल तर घरातूनच काम करा’ असे आवाहन केले आहे तसेच बार आणि हॉटेल्स लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

तात्काळ पावलं उचलली नाहीत तर, मृतांची संख्या वाढू शकते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. जॉन्सन यांनी मार्चसारखा लॉकडाउन पुन्हा केलेला नाही. पण करोनाचा फैलाव आटोक्यात आला नाही तर पुढील निर्णय घ्यावे लागतील असे जॉन्सन यांनी म्हटले आहे. बोरीस जॉन्स यांनी मंत्री आणि युनायटेड किंगडमच्या नेत्यांची बैठक घेतली. असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले आहे.

‘मोठया प्रमाणात निर्बंध लागू करण्याचा अधिकार आम्ही राखून आहोत’ असे जॉन्सन यांनी सांगितले. “वर्तणुकीत बदल आणि नवीन उपायोजना लागू पडल्या तर कठोर निर्बंधांची वेळ येणार नाही” असे जॉन्सन म्हणाले. काही आठवडयांपूर्वीच त्यांनी लोकांना कामावर परतण्याचे आवाहन केले होते. पण आता शक्य असेल तर घरातून काम करा असे त्यांनी म्हटले आहे. सर्व पब, बार आणि हॉटेल्स गुरुवारपासून रात्री दहावाजता बंद करण्याचे आदेश दिले आहेत.