गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी उत्तराखंड पुरपरिस्थितीत अडकलेल्यांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न करत असलेल्या सैनिकांचे आभार व्यक्त केले आहेत. मनोहर पर्रिकर यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून  उत्तराखंडात सुरू असलेल्या मदत कार्याबद्दलची स्तुती करण्यात आली आहे.
“खरंच भारतीय लष्करातील सैनिकांना माझा सलाम. उत्तराखंडात आज सैन्यदलाच्या कार्याचे महत्व लक्षात घेण्याजोगे आहे. घडलेली आपत्ती हृद्याला चटका लावणारी आहे आणि दररोज माध्यमांद्वारे तेथील भयाण दृष्य पाहून मन दिवसेंदिवस आणखी हेलावते आहे”. असे मनोहर पर्रिकर यांच्या फेसबुक पेजवर नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर “घडलेल्या प्रसंगातून आपण धडा घेतला पाहिजे, यातून पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.” असेही म्हटले
गोवा सरकारकडून याआधीच उत्तराखंडातील पुरग्रस्तांसाठी पाच कोटींचा मदतनिधी व तेथील दोन गावे दक्तक घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर, “पुर्नवसित करण्यात येणाऱया दोन गावांबद्दलची संपुर्ण माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल” असे पर्रिकर यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर इतरांनीही मोठ्यामनाने मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी फेसबुकच्या माध्यामातून केले आहे.