भारत व पाकिस्तान या दोन देशांतील काश्मीरप्रश्न सोडवण्यास आम्ही मध्यस्थी करण्यास कयार आहोत, पण त्या देशांनी तशी मागणी केली तरच आम्ही मध्यस्थीची भूमिका पार पाडू, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी सांगितले.
मून यांचे हंगामी प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले, की काश्मीरप्रश्नी आम्ही जगातील इतर तंटय़ात जशी मध्यस्थी किंवा मदत उपलब्ध करून देतो तशी भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीरप्रश्नावरही मध्यस्थी करता येईल, पण त्या दोन देशांनी तशी विनंती करणे आवश्यक आहे.
काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख भारताला पाकिस्तानशी काश्मीरप्रश्नी चर्चा करण्यास भाग पाडण्याचा प्रस्ताव मांडू शकतील काय, असे विचारले असता हक म्हणाले, की दोन्ही देशांनी विनंती केली तरच संयुक्त राष्ट्रे मध्यस्थी करू शकतात. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणिसांनी आतापर्यंत अनेकदा आंतरराष्ट्रीय तंटय़ात सार्वजनिक, खासगी मार्गाने मदत केली आहे. त्यात स्वातंत्र्य, निष्पक्षपातीपणा व एकात्मता यात कुठेही बाधा येऊ दिलेली नाही असे त्यांनी सांगितले.
तंटा असलेल्या संबंधित देशांना शांततेसाठी चर्चेच्या पातळीवर आणून राजकीय व लष्करी संघर्ष रोखणे शक्य आहे. भारताने मात्र काश्मीरप्रश्नी पाकिस्तानबरोबरचा तंटा सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपास नकार दिला आहे. पाकिस्तानने मात्र अनेकदा काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांच्या आधारे हा तंटा सोडवण्यासाठी महत्त्वाची चौकट तयार करता येईल असे पाकिस्तानचे मत आहे.

सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारतासोबत एकत्रित काम करणार – चीन
सीमावादावर सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी भारताला सहकार्य करून चर्चा करण्याची आपली तयारी असल्याचे चीनने शुक्रवारी स्पष्ट केले. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी तसेच दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सुसंवादाचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी येत्या १० आणि ११ फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमधील चर्चेची १७  वी फेरी पार पडणार आहे. या पाश्र्वभूमीवर चीनने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
दोन्ही देशांच्या हितासाठी सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे असल्याचे चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते होंग लेई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये झालेल्या सीमा संरक्षण सहकार्य करार झाल्यानंतर प्रथमच ही चर्चा होणार आहे.
सीमावाद सोडवण्यासाठी चीन भारत सरकारबरोबर काम करण्यास तयार आहे. तसेच दोन्ही देशांना मंजूर होईल अशा पद्धतीने वाटाघाटींची प्रक्रिया सुरूच ठेवली जाईल. जेणेकरून दोन्ही देशांमधील सुसंवाद वाढीस लागेल, असे होंग यांनी सांगितले.
भारती आणि चीन यांच्यात सीमावादावर तोडगा काढण्यासाठी करार होऊनही २००५ पासून विशेष काही साध्य झाले नसल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. तेव्हा भविष्यात सुसंवादावर अधिक भर देऊन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी भारताबरोबर सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.