केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुन्हा एकदा दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून शाह यांना आरोग्यविषयक समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सध्या अमित शाह यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. शिवाय, त्यांची प्रकृती देखील स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. मागील दीड महिन्यात तीन वेळा शाह यांना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं आहे.या अगोदर १८ ऑगस्ट रोजी शाह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना ३१ ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

अमित शाह यांना २ ऑगस्ट रोजी करोनाची लागण झाली होती. अमित शाह यांनीच स्वत: ट्विट करत ही माहिती दिली होती. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं होतं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शाह मेदांता रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी अमित शाह यांनी संपर्कात आलेल्यांना स्वत:चं विलगीकरण तसंच चाचणी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांनी आपली करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तसंच डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे काही दिवस मी स्वतःला होम क्वारंटाइन करणार असल्याचं शाह यांनी सांगितलं होतं.