हैदराबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींप्रमाणे माझ्या मुलीच्या आरोपींना शिक्षा द्या, अशी मागणी उन्नाव बलात्कार पीडितीच्या वडिलांनी केली आहे. उन्नाव येथील बलात्कार पीडितेचा शुक्रवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात मृत्यू झाला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता, त्यात ती ९० टक्क्य़ांहून अधिक भाजल्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री ११.४० च्या सुमारास रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. यानंतर प्रतिक्रिया देताना तिच्या वडिलांनी हैदराबादमधील आरोपीप्रमाणेच आपल्या मुलीच्या आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली.

दरम्यान, आपल्याला मुलीच्या मृत्यूची सुचना देण्यात आली नव्हती, असंही तिच्या वडिलांकडून सांगण्यात आलं. तसंच आरोपींना हैदराबादमधील आरोपींप्रमाणेच शिक्षा देण्यात यावी किंवा त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. एका हिंदी वृत्तवाहिनीला त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आरोपींना शिक्षा मिळाल्यानंतरच आपल्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभेल, असंही ते म्हणाले.

कुटुंबाला मिळाली जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. तसंच मारहाणदेखील करण्यात आली असल्याची माहिती पीडितेच्या कुटुंबीयांनी दिली. आपल्याला पैसे किंवा अन्य कोणत्याही गोष्टीची लालसा नाही. परंतु या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा देऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

पाच जणांकडून हल्ला
तिच्यावर गेल्यावर्षी बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींपैकी एकाला दहा दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे. गुरुवारी सकाळी पाच जणांनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिलं होतं. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत लखनौ येथे आणि नंतर तेथून दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दिल्ली वाहतूक पोलिसांनी तिला विमानतळावरून तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी विनाअडथळा हरित मार्गिका उपलब्ध करून दिली होती. परंतु शुक्रवारी रात्री पीडितेनं अखेरचा श्वास घेतला.