अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले असतानाच अमेरिकेने पाकची आर्थिक कोंडी केली आहे. पाकिस्तानला सुरक्षेसाठी दिली जाणारी १.६ अब्ज डॉलरची मदत थांबवण्यात आल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओसामा बिन लादेनवरुन त्यांनी पाकला फटकारले होते. लादेन हा पाकिस्तानमध्ये होता. पाकिस्तानमधील लष्करी अकादमीच्या बाजूलाच लादेन राहायचा. तो पाकमध्ये असल्याचे बहुधा सर्वांनाच माहित असावे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. आम्ही पाकिस्तानला वर्षाला १.३ अब्ज डॉलरची मदत केली. पण ही मदत आम्ही बंद केली असून पाकिस्तान आमच्यासाठी काहीच करत नाही, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेतील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल रॉब मॅनिंग यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, पाकिस्तानला दिली जाणारी १.६ अब्ज डॉलरची मदत थांबवण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील त्यांनी दिलेला नाही.

ओबामा यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मध्य आशिया या विभागात कार्यरत असलेले डेव्हिड सिडनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यातून अमेरिका किती वैतागली आहे हे दिसते. पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेतलेली नाही. अमेरिकेसाठी हीच चिंतेची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले. पाकिस्तानचे नेते सहकार्याचे आश्वासन देतात. पण आश्वासनापलीकडे ते काहीच करत नाही. त्यामुळेच ट्रम्प आणि अमेरिकेचे नागरिक आता वैतागले आहेत, असे त्यांनी सांगितले.