भारतीय विमान कंपन्यांनी इराणमधील धोकादायक हवाई क्षेत्रातून उड्डाण न करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी दुसऱ्या सुरक्षित हवाई मार्गाचा पर्याय निवडण्यात येईल. भारतीय हवाई क्षेत्राचे नियमन करणाऱ्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) ही माहिती दिली. इराणने अमेरिकेचे ड्रोन विमान पाडल्यामुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व भारतीय ऑपरेटर्सनी डीजीसीएसोबत चर्चा करुन इराणमधील धोकादायक हवाई मार्गावरुन प्रवास न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासासाठी सुरक्षित हवाई मार्ग निवडण्यात येईल अशी माहिती डीजीसीएने टि्वट करुन दिली आहे. अमेरिकन हवाई यंत्रणेने अमेरिकेतील नोंदणीकृत विमानांना पर्शियन गल्फ, ओमान आणि इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण न करण्याचे निर्देश दिल्यानंतर डीजीसीएने भारतीय विमान कंपन्यांना हे आदेश दिले आहेत.

अमेरिकन हवाई यंत्रणेच्या आदेशानंतर अमेरिकास्थित युनायटेड एअरलाइन्स या कंपनीने नेवार्क-मुंबई विमानसेवा तात्पुरती स्थगित केली आहे. एअर इंडियाच्या विमानांची भारताच्या वेगवेगळया शहरातून अमेरिकेतील न्यूयॉर्क, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को आणि वॉशिंग्टन डीसी या शहरांमध्ये सेवा सुरु आहे.