भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या संघर्षात अमेरिकेचं लष्कर भारताला साथ देणार असल्याचं व्हाइट हाऊसच्या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. अमेरिकेन नौदलाने आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी दक्षिण चीन समुद्रात दोन लढाऊ विमानं तैनात केली असून त्याच पार्श्वभूमीवर हे वक्तव्य करण्यात आलं आहे. “आमचा संदेश स्पष्ट आहे. आम्ही फक्त दर्शक म्हणून उभे राहत चीन किंवा इतर कोणालाही सर्वात शक्तिशाली किंवा प्रभावशाली होण्यासाठी हाती कमान देणार नाही. मग तो कोणताही भूभाग किंवा प्रदेश असो,” असं व्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोज यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटलं आहे.

प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, “संदेश स्पष्ट आहे. आमचं लष्कर ठामपणे उभं असून भविष्यातही राहील….मग ते भारत आणि चीनमधील संघर्ष असो किंवा इतर कुठेही असो”.

चीनची सैन्यमाघार
भारत-चीन धुमश्चक्रीत २० जवान शहीद झाल्याने तणावाचे केंद्र ठरलेल्या पूर्व लडाखच्या काही ठिकाणांहून चीनने सोमवारी सैन्यमाघारीस सुरुवात केली. चीनचे सैन्य दीड किलोमीटपर्यंत मागे सरकल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. त्यामुळे तेथील तणाव निवळू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही देशांत लष्करी पातळीवर झालेल्या चर्चेत सैन्य माघारीवर मतैक्य झाले होते. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात रविवारी दूरध्वनीवर चर्चा झाल्यानंतर दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले.

चिनी बाजूकडे रविवारी सायंकाळी काही हालचाली सुरू होत्या. त्यावरून माघारीची प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसत होते. आता त्यांनी संरक्षक बांधकामही पाडले असून ती जागा मोकळी झाली आहे. सैनिकांना माघारी नेण्यासाठी काही लष्करी वाहनांच्या हालचालीही दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तणाव निवळण्यावर उभय देशांत मतैक्य
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवर रविवारी चर्चा केली. त्यात दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून सैन्य मागे घेण्याचे मान्य केले. चर्चेनंतर दोन्ही देशांनी सीमेवरून सैन्यमाघारीस सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन्ही देशांनी सीमेवरील सैन्य माघारीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे मान्य केल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र कामकाज मंत्रालयाने दिली. डोभाल आणि वँग यांनी तणाव निवळण्याबरोबरच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पालन करण्याची ग्वाही परस्परांना दिली.