अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्याबाबत भारतासमवेत चर्चा सुरू केली आहे. भारतासमवेत संरक्षण संबंध बळकट करण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असल्याचे पेण्टागॉनने म्हटले आहे. भारताला चीन आणि पाकिस्तानकडून असलेले आव्हान लक्षात घेता अमेरिकेकडून हे तंत्रज्ञान मिळाले तर ते  अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी जी रणनीती आहे त्यामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. पेण्टागॉनच्या ८१ पानांच्या क्षेपणास्त्र संरक्षण आढावा अहवालामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेकडून भारताला अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान मिळाले तर चीन आणि पाकिस्तानवर दबाव वाढणार आहे.

भारत पाच अब्ज डॉलर खर्च करून रशियाकडून एस-४०० हवाई क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली विकत घेणार होता. भारताच्या या निर्णयावर अमेरिकेने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. क्षेपणास्त्र क्षमता आता केवळ जगातील काही भागांपुरती मर्यादित राहिलेली नाही. दक्षिण आशियातील अनेक देश आता अत्याधुनिक आणि विविध टप्प्यांपर्यंत मारक क्षमता असलेली बॅलेस्टिक, क्रूझ क्षेपणास्त्रे विकसित करीत आहेत, असे पेण्टागॉनच्या अहवालामध्ये म्हटले आहे. अमेरिकेने भारतासमवेत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान सहकार्याची चर्चा केली. रशिया आणि चीनच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमापासून अमेरिकेला धोका असल्याचे अहवालामध्ये म्हटले आहे. यापूर्वी भारताला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देण्याबाबत अमेरिकेने स्वारस्य दाखविले नव्हते. आता अमेरिकेची इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी जी रणनीती आहे त्यामध्ये ट्रम्प प्रशासनाने हे तंत्रज्ञान भारताला देण्याची तयारी दर्शविली आहे.

गगनयान मोहिमेतील अंतराळवीर मुख्यत्वे वैमानिकच असतील

मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’मधील अंतराळवीर हे मुख्यत्वे वैमानिक असतील, असे संकेत ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी शुक्रवारी येथे दिले. ज्या वैमानिकांना उड्डाणाचा पुरेसा अनुभव आहे अशा लोकांचा आम्ही शोध घेत आहोत, असेही इस्रोच्या एका वैज्ञानिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

मानवी अंतराळ मोहीम प्रकल्पासाठी अंतराळवीरांची निवड करण्यात भारतीय हवाई दल आणि अन्य संस्थांची महत्त्वाची भूमिका असेल, असे इस्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर या निवड प्रक्रियेमध्ये डीआरडीओचीही तितकीच महत्त्वाची भूमिका असेल, असेही एका वैज्ञानिकाने स्पष्ट केले.

पहिली मानवरहित गगनयान मोहीम डिसेंबर २०२० मध्ये होणार आहे, तर दुसरी मानवरहित गगनयान मोहीम जुलै २०२१ मध्ये हाती घेण्यात येणार आहे. तर अंतिम मानवी मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये हाती घेण्यात येणार आहे, असे के. सिवान यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.