नरेंद्र मोदी हे माझे चांगले मित्र आहेत, असे म्हणणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींची एक इच्छा अपूर्णच ठेवली. अमेरिका दौऱ्यात मोदींना ट्रम्प यांच्यासोबत कॅम्प डेव्हिड येथे डिनरला जायचे होते. मात्र, ट्रम्प यांनी यासाठी नकार दिला आणि मोदींची ही इच्छा अपूर्ण राहिली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कॅम्प डेव्हिड येथे अलिशान फार्म हाऊस आहे. राष्ट्राध्यक्षांना एकांतवास हवा असेल किंवा कुटुंबियांना काही वेळ द्यायचा असेल तर ते कॅम्प डेव्हिड येथे जातात. काही निवडक देशांच्या नेत्यांसोबत या ठिकाणी गुप्त बैठकाही झाल्या आहेत. या ठिकाणी ट्रम्प यांच्यासोबत डिनरला जाऊन त्यांच्यासोबतचे संबंध सुधारण्याचा मोदींचा प्रयत्न होता. मोदींनी तशी इच्छाही व्यक्त केली. मात्र, व्हाइट हाऊसने यासाठी नकार दिला.

अमेरिकेतील पत्रकार बॉब वुडवर्ड यांच्या ‘फिअर, ट्रम्प इन द व्हाइट हाऊस’ या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिका दौऱ्यात नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी अफगाणिस्तानबाबत चर्चा केली. अफगाणिस्तानमधून अमेरिकेला काहीच मिळाले नाही. मोदींचे हे विधान ऐकून ट्रम्प प्रभावित झाले होते. जुलै २०१७ मध्ये मोदी- ट्रम्प यांच्यातील भेटीदरम्यान हा प्रसंग घडला होता. या भेटीच्या तीन आठवड्यानंतर व्हाइट हाऊसमधील बैठकीत ट्रम्प यांनी हा किस्सा सांगितला होता.

ट्रम्प म्हणाले होते की अफगाणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात खनिजांचा साठा आहे. अमेरिकेला मदतीच्या मोबदल्यात अफगाणिस्तानमधील खनिज साठा हवा होता. मोदी जोवर मदत करत आहेत तोवर पाकिस्तानची मदत बंद केली पाहिजे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मोदी हे माझे चांगले मित्र असल्याचेही त्यांनी म्हटले होते.