अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी

वॉशिंग्टन : माध्यमांमध्ये प्रशासनाबाबतच्या सतत नकारात्मक बातम्या प्रसिद्ध होत असल्याने त्रस्त झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमसंस्थांना देण्यात येणाऱ्या लाभांपासून वंचित करू, अशी धमकी ट्विटरवरून दिली आहे.

आर्थिक आणि इतर बाबतीतही आम्ही मोठय़ा प्रमाणात यश मिळवत असताना माध्यमांकडून सातत्याने नकारात्मक बातम्या दिल्या जात आहेत. आमच्या प्रशासनाबाबतच्या माध्यमांमधील ९१ टक्के बातम्या खोटय़ा असल्याचा दावाही ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये केला आहे. आम्ही प्रचंड कष्ट घेत असताना भ्रष्ट माध्यमांसोबत का राहायचे असा प्रश्न करताना माध्यमांना सर्व लाभांपासून वंचित करू, असे ट्रम्प म्हणाले.

निवडणूक प्रचारात ट्रम्प यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘पॉलिटिको’ या माध्यमसंस्थांना कोणतेही लाभ देण्यास नकार दिला होता. त्यानंतर या दोन्ही माध्यमसंस्थांना लाभ देण्यात आले.

माध्यमांकडून सातत्याने खोटय़ा बातम्या दिल्या जातात, अशी ट्रम्प यांची सातत्याची ओरड आहे. सत्तेत आल्यानंतर ट्रम्प यांनी अनेक माध्यमांना अधिकचे लाभ दिले होते.