24 January 2019

News Flash

संतापजनक! लग्नसमारंभादरम्यान ७ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

इटाह जिल्ह्यातील शीतलापूर गावात सोमवारी संध्याकाळी एका पत्रकाराच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नसमारंभात एक दाम्पत्य, त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसह आले होते.

प्रतिकात्मक छायाचित्र

देशभरात कठुआ आणि सुरतमधील लहान मुलीवरील बलात्कार प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली असतानाच आता उत्तर प्रदेशमधील इटाह जिल्ह्यात सात वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व प्रकार एका लग्नसमारंभादरम्यान घडला आहे.

इटाह जिल्ह्यातील शीतलापूर गावात सोमवारी संध्याकाळी एका पत्रकाराच्या बहिणीचे लग्न होते. या लग्नसमारंभात एक दाम्पत्य, त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसह आले होते. पीडित मुलीचे आईवडील लग्नसमारंभात कामात व्यस्त असताना सोनू जातव ( १९ वर्ष) या नराधमाने चिमुरडीला गाठले. यानंतर त्याने पीडित मुलीला लग्नसमारंभापासून जवळ असलेल्या एका पडक्या घरात नेले. त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला आणि  त्यानंतर तिची हत्या केली.

दुसरीकडे बराच वेळ मुलगी दिसत नसल्याने आई- वडिलांनी अन्य नातेवाईकांच्या मदतीने मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली. शेवटी सोमवारी रात्री साडे बाराच्या सुमाराच पीडित मुलगी पडक्या घरात बेशुद्ध अवस्थेत सापडली. ती अर्धनग्न अवस्थेत होती आणि तिच्यावर शरीरावर जखमा होत्या आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. पीडित मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यानंतरच हत्या कशी झाली हे स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी सोनूला अटक करण्यात आली आहे, असे इटाह पोलीस अधीक्षक अखिलेश चौरसिया यांनी सांगितले.

First Published on April 17, 2018 2:16 pm

Web Title: uttar pradesh 7 year old girl raped and killed during wedding ceremony in etah