रियो ऑलिंपिकमधील बॅडमिंटन स्पर्धेचा महिलांच्या अंतिम सामन्यात पी.व्ही. सिंधूने सुवर्णपदक मिळवावे या शुभेच्छांसह हजारो भारतीय दूरचित्रवाहिन्यांवर हा सामना पाहात होते. मात्र याचवेळी आंध्रप्रदेश आणि तेलंगातील लोकांना वेगळीच चिंता होती – यातील अनेकजण गुगलवर सिंधूची जात शोधत होते!

सिंधू ही आपलीच मुलगी (अम्मायी) असल्याचा दोन्ही राज्यांनी दावा केल्याचे वृत्त ‘दि हिंदू’ने शनिवारी दिले. लोकांनी सिंधूची जात शोधण्याचे आणखी एक कारण म्हणजे, तिच्या पालकांनी प्रेमविवाह केला आहे, ज्यात जातीचे भेद नेहमी विसरले जातात.

गुगल सर्च बारमध्ये सिंधूबाबत माहिती घेऊ पाहताच ‘पीव्ही सिंधू कास्ट’ हे शब्द ‘सर्च सजेशन’मध्ये झळकतात. सिंधूने अंतिम सामन्यात रौप्यपदक मिळवल्यानंतर, म्हणजे २० ऑगस्टला या सजेशनचा मोठय़ा प्रमाणात शोध घेतला गेला.

जेथे सिंधूच्या जातीचा सर्वाधिक शोध घेण्यात आला, त्यात आंध्रप्रदेश, तेलंगणा व हरयाणा ही तीन राज्ये आघाडीवर होती. मात्र केवळ सिंधू लोकांच्या पूर्वग्रहाचे लक्ष्य नव्हती. साक्षी मलिकने कुस्तीत कांस्य पदक मिळवले, त्या दिवशी ‘साक्षी मलिक कास्ट’ चा मोठय़ा प्रमाणावर शोध घेण्यात आला आणि अजूनही तो सुरू आहे. राजस्थान, दिल्ली व उत्तरप्रदेश या राज्यांमधून सर्वाधिक शोध घेतला जात आहे. ‘पीव्ही सिंधू कास्ट’, ‘साक्षी मलिक कास्ट’, ‘पुसरला कास्ट’ यासारखे शब्द टाईप करून या दोघींची जात शोधली जात आहे.

या गोष्टीबाबत काहीच आश्चर्य वाटण्यासारखे नाही, कारण व्यक्तीच्या जातीचे श्रेष्ठत्व हे कौशल्य, वर्षांनुवर्षांचे परिश्रम आणि अनेक वर्षांची निष्टा यापेक्षा वरचढ ठरते!

सिंधू व साक्षी या दोघींनीही अतिशय कमी वयात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रथमच असे यश मिळवले आहे. मात्र, त्यांच्या जातीची ओळख जोवर पटत नाही, तोपर्यंत त्यांचे हे देदिप्यमान यश दुय्यम आहे. ज्या देशात अशाप्रकारच्या भेदभावाचे अंतप्र्रवाह अस्तित्वात आहेत, तेथे यशाचा मुद्दा जातीनंतर येतो!