अहमदाबाद: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवसिंह सोळंकी (वय ९३) यांचे येथे निधन झाले. ते चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. गुजरातच्या राजकारणावर सोळंकी यांनी प्रभुत्व गाजवले होते.

सोळंकी हे जून १९९१ ते मार्च १९९२ या काळात परराष्ट्रमंत्री होते. नंतर त्यांनी स्वित्र्झलडच्या परराष्ट्रमंत्र्यांना दावोस येथे भेटून बोफोर्स प्रकरणी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजीनामा दिला होता. सोळंकी हे दोनदा गुजरातमधून राज्यसभेवर खासदार झाले होते. त्यांचे पुत्र भारतसिंह सोळंकी हे केंद्रात मंत्री होते. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सोळंकी यांच्या निधनानिमित्त एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला. सोळंकी हे कणखर नेते होते अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सोळंकी यांनी काँग्रेसची विचारसरणी बळकट करून सामाजिक न्यायासाठी काम केले शब्दांत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

१९८५ मध्ये राज्यात काँग्रेसने विधानसभेच्या १८२ पैकी १४९ जागा जिंकल्या होत्या. हा विक्रम  अबाधित आहे. या निवडणुकीत क्षत्रिय, हरिजन, आदिवासी, मुस्लीम यांना एकत्र आणण्याचे (खाम) सूत्र त्यांनी यशस्वीपणे अमलात आणले. राजकारणप्रवेश करण्यापूर्वी गुजरात समाचार या दैनिकात त्यांनी पत्रकारिता केली.