22 January 2021

News Flash

संजय जोशींप्रमाणे माझ्याही बनावट सीडींचे वाटप सुरू, तोगडियांचा नवा आरोप

बनावट व्हिडिओ वाहिन्यांवर दाखवण्याचा गुजरात क्राईम ब्रँचचा डाव

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. अहमदाबादमधील रूग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा आरोपांची राळ उठवली. दिल्लीतील ‘पॉलिटिकल बॉस’च्या इशाऱ्यावर गुजरात पोलीस माझ्याविरोधात मोठा कट रचत आहेत. या कटात गुन्हे शाखेचे सहआयुक्त जे के भट्ट यांचाही समावेश असून ज्याप्रमाणे संजय जोशी यांची बनावट सेक्स सीडी बनवण्यात आली. तशीच माझीही बनावट सीडी करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले प्रवीण तोगडिया-
‘गुजरातच्या क्राईम ब्रँचचे ‘कॉन्परन्सी ब्रँच’मध्ये रूपांतर झाले आहे. सहआयुक्त जे के भट्ट यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल्स सार्वजनिक व्हावेत. ते दिल्लीतील ‘पॉलिटिकल बॉस’च्या इशाऱ्यावर काम करत आहेत. माझा दावा आहे की, नुकताच त्यांची अनेकवेळा पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली आहे. मी मित्र नरेंद्र मोदींना विनंती करतो की, त्यांनी क्राईम ब्रँचला कॉन्परन्सी ब्रँच बनवून त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये. रात्री दोन वाजता कोणत्याही व्यक्तीला उठवण्याचा कोणाला अधिकार आहे ? माझ्या माणसांना उठवून टॉर्चर करण्यात येत असून त्यांना माझ्याविरोधात जबाब देण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे.

गुजरातमधील क्राईम ब्रँच माझ्याविरोधात निवडक व्हिडिओ वाटत आहेत. वृत्त वाहिन्यांना व्हिडिओ पुरवण्यात येत आहे. मी सांगू इच्छितो की २००५ मध्ये संजय जोशी यांच्याविरोधातही बनावट व्हिडिओ बनवून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या महान प्रचार व्यवस्थेला बदनाम करण्यास सुरूवात झाली होती. बनावट सीडी बनवणाऱ्याचे नाव मला माहीत आहे, योग्य वेळी त्याचा मी खुलासा करेन. बनावट व्हिडिओ वाहिन्यांवर दाखवण्याचा क्राईम ब्रँचचा डाव आहे. गुजरातची जनता त्यांना ओळखते. मी सत्याच्या मार्गावर चालणारा आहे. राजस्थान सरकारने मला सूचित केले आहे की, माझ्याविरोधात सुरू असलेला जुना खटला २०१५ मध्येच मागे घेतला आहे. मग मकर संक्रांतीच्या दिवशी मला अटक करण्यासाठी पोलिसांचा ताफा कोणी पाठवला. रूग्णालयात मला अनेक लोक भेटण्यासाठी आले. मी कोणालाही निमंत्रण दिले नव्हते. उत्तर प्रदेशमध्ये ३०० हून अधिक आमदारांमध्ये १०५ आमदार हे सप-बसप आणि काँग्रेसचे आहेत. भाजपाचे काँग्रेसीकरण करण्याऱ्यांना तरी किमान हा प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. माझी हिंदुत्वाची विचारधारा स्पष्ट आहे. मी कायम ही लढाई लढेल. मी वकिलांशी चर्चा करत आहे आणि क्राईम ब्रँचविरोधात कायदेशीर पाऊल उचलणार आहे.’

दरम्यान, तोगडिया सोमवारी संशयितरित्या गायब झाले होते. नंतर संध्याकाळी अहमदाबादमधील शाहीबाग परिसरातील एका उद्यानात ते बेशुद्धावस्थेत आढळून आले होते. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले. मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी आपला आवाज दाबण्याचे काम चालू असून पोलिसांनी माझा एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 1:36 pm

Web Title: vhp pravin togdiya pm narendra modi sanjay joshi sex cd rss bjp
Next Stories
1 पोलीस आणि गुंडांच्या चकमकीत आठ वर्षांच्या मुलाचा बळी
2 त्रिपुरा, मेघालय, नागालँडमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले
3 अण्वस्त्र क्षमतेच्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी; ५००० किमी मारक क्षमता
Just Now!
X