व्हिडीओकॉनकडून ८५ कोटी नव्हे, तर ८५ लाखांची देणगी मिळाल्याचे निवडणूक आयोगाला सुधारित प्रतिज्ञापत्र

केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केलेल्या देणग्यांच्या तपशिलामधील ‘प्रिंटिंग मिस्टेक’ शिवसेनेला भलतीच महागात पडली. २०१५-१६मध्ये व्हिडीओकॉन उद्योगसमूहाकडून ८५ कोटींची, नव्हे तर ८५ लाख रुपयांची देणगी मिळाल्याचा खुलासा करणारे सुधारित प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची वेळ शिवसेनेवर ओढविली. पण ८५ कोटींमधील दोन शून्ये काढून टाकल्याने सर्वाधिक देणगी मिळविणारा राजकीय पक्ष असल्याचा ‘बहुमान’ मात्र शिवसेनेच्या हातातून निसटला आहे..

‘व्हिडीओकॉनने दिलेल्या देणगीचा तपशील चुकीचा लिहिला (टायपोग्राफिकल मिस्टेक) असल्याने आम्ही ‘२४ अ’ क्रमांकाचा अर्ज नव्याने सादर करीत आहोत,’ असे शिवसेनेने आयोगाला सादर केलेल्या सुधारित प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर औद्योगिक देणगीदारांच्या यादीमध्ये क्रमांक सातवर असलेल्या व्हिडीओकॉनसमोर ८५,००,००० रुपयांची (८५ लाख रुपये) सुधारित नोंद केली. जुन्या अर्जामध्ये व्हिडीओकॉनसमोर ८५,००,००,००० रुपये (८५ कोटी रुपये) असा उल्लेख होता.

व्हिडीओकॉन समूहाचे मुख्य वेणूगोपाल धूत यांनीही स्वतंत्रपणे खुलासा करून देणगी ८५ कोटी नव्हे, तर ८५ लाख रुपये असल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेपाठोपाठ व्हिडीओकॉनसुद्धा आयोगाकडे स्वतंत्र खुलासा करणार आहे. शिवसेनेसाठी ओंजळ रिती करणाऱ्या व्हिडीओकॉनच्या देणग्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने (१८ नोव्हेंबर) निवडणूक आयोगाच्या हवाल्याने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. जुना अर्ज लिहिताना झालेल्या गंभीर चुकीची तातडीने दुरुस्ती करून शिवसेनेने सुधारित तपशील त्याचदिवशी आयोगाला सादर केला.

व्हिडीओकॉनसमोरच्या रकमेसमोर दोन ज्यादा शून्य देण्याच्या करामतीने देणगीची रक्कम ८५ लाखांवरून थेट ८५ कोटींवर पोचली. त्यातच शिवसेनेला मिळालेल्या (जुन्या आकडय़ानुसार) ८६ कोटी ८४ लाख १४ हजार ४१८ रुपयांच्या एकूण देणग्यांमध्ये एकटय़ा व्हिडीओकॉनचा वाटा थेट ८५ कोटी रुपये म्हणजे जवळपास ९८ टक्के असल्याचे दिसत होते. यातून शिवसेनेचा आर्थिक डोलारा फक्त व्हिडीओकॉनच्या एकखांबी तंबूवर अवलंबून असल्याचे चित्रही उमटले होते. याशिवाय व्हिडीओकॉनचे प्रवर्तक व सहमालक राजकुमार धूत यांना शिवसेनेने सलग तीन वेळा (२००२, ०८ आणि २०१४) राज्यसभेवर पाठविण्याचाही संदर्भ होता.

व्हिडीओकॉनने २०१४-१५मध्येही शिवसेनेला दोन कोटी ८३ लाखांची देणगी दिली होती. मात्र, नव्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी १५-१६मध्ये हात आखाडता घेतला. व्हिडीओकॉनने शिवसेनेव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसलाही २५ लाखांची देणगी दिली आहे. राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण ७१ लाख ३४ हजारांच्या देणग्यांमध्ये एकटय़ा व्हिडीओकॉनचा हिस्सा सुमारे तीस टक्क्यांचा आहे.

दोन ज्यादा शून्यांची करामत..

सुधारित तपशिलानुसार शिवसेनेला मिळालेल्या देणग्यांचा एकूण आकडा ८६ कोटी ८४ लाख १४ हजार ४१८ रुपयांवरून थेट दोन कोटी ६९ लाख १४ हजार ४१८ रुपयांवर आला आहे. पर्यायाने सर्वाधिक देणगी मिळविणारा पक्षाचा मान शिवसेनेकडून काँग्रेसकडे गेला आहे. काँग्रेसला एकूण सुमारे २२ कोटींच्या देणग्या मिळवित्या आल्या. ३० सप्टेंबरची मुदत उलटून गेल्यानंतरही भाजपने अद्याप तपशील दिलेला नाही. २०१४-१५चा आकडा (४३७.३५ कोटी) पाहिल्यास २०१५-१६मध्येही सत्तारूढ भाजपलाच पुन्हा एकदा सर्वाधिक देणग्या मिळाल्या असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.