हिमाचल प्रदेशमध्ये मुख्यमंत्री वीरभद्र सिंह हेच काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असेल अशी घोषणा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. तसेच वीरभद्र हे सातव्यांदा मुख्यमंत्री होतील असा दावा राहुल यांनी मंडी जिल्ह्य़ातून पक्षाच्या प्रचाराची सुरुवात करताना स्पष्ट केले. ८३ वर्षीय सिंह यांच्या नेतृत्वात हिमाचलचा सर्वागीण विकास झाल्याचे कौतुक राहुल यांनी केले. जनतेने गुजरात व हिमाचलच्या विकासाची तुलना करावी असे आवाहन करत, चीन रोज पन्नास हजार युवकांना रोजगार देत असून, केंद्र सरकारला मात्र साडेचारशे युवकांना रोजगार देणे शक्य होत असल्याची टीका त्यांनी केली. काँग्रेसचे हिमाचल प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सुकू व वीरभद्र यांच्यात संघर्ष आहे. त्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने वीरभद्र यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणे महत्त्वाचे आहे. हिमाचलमध्ये या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे.