गोव्यात एका परिषदेत हजर राहण्यासाठी तालिबानी म्होरक्या मुल्ला अब्दुल सलाम जईफ याला गुप्तचर खात्याच्या आग्रहानंतरच व्हिसा देण्यात आल्याचे गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
अफगाणिस्तानातून अमेरिकी आणि नाटोचे सैन्य मायदेशी परतल्यानंतर तेथील परिस्थिती हाताळण्यात भारताला अडचण येऊ नये, यासाठी जईफ याला व्हिसा द्यावा, असा आग्रह गुप्तचर खात्याने धरला होता. पुढील वर्षी अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्य माघारी जाणार आहे. त्यावेळी भारताला तालिबानी संघटनेला सामोरे जावे लागेल. पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाने तालिबानी संघटनेशी संबंध राखले आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानात सैन्य पाठवेपर्यंत, म्हणजेच २००१ पर्यंत अफगाणिस्तानात मुल्ला ओमर याच्या नेतृत्वाखाली तालिबानी सरकार होते. जईफ हा मुल्ला ओमर याचा अत्यंत निकटवर्ती मानला जातो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, जईफ याला व्हिसा देऊन भारताने मुत्सद्दी पातळीवर लवचिकता ठेवावी, असे गुप्तचर विभागाचे मत होते.
जागतिक दहशतवादाच्या प्रश्नावर गृह मंत्रालयाने व्हिसा धोरणात अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन व अन्य काही देशांतील नागरिकांना व्हिसा देताना त्यांचा दहशतवादी कारवायांशी दूरान्वयानेही संबंध नसल्याची खात्री करून घेतली जाते.