व्होडोफोन- आयडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा बालेश शर्मा यांनी वैयक्तीक कारणामुळे राजीनामा दिला आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, त्यांच्या जागी व्होडाफोन समूहाचे भारतातील प्रतिनिधी रवींद्र टक्कर यांना तत्काळ प्रभावाने एमडी आणि सीईओपदी नियूक्त करण्यात आले आहे.
बालेश शर्मा यांनी वैयक्तीक कारणांमुळे व्होडाफोन-आयडियाच्या सीईओपदावरून पायउतार होऊ द्यावी, ही केलेली विनंती मान्य करण्यात आली असल्याचे व्होडाफोन-आयडिया लिमिटेडच्या बोर्डाने आज जाहीर केले. तसेच, शर्मा हे लवकरच व्होडाफोन ग्रुपमध्ये नवी जबाबदारी स्वीकारतील, याबाबत लवकरच घोषणा केली जाईल असेही सांगण्यात आले आहे.

व्होडाफोन-आयडियाच्या विलिनीकरणापासून शर्मा हे सीईओ पदावर होते. त्या अगोदर त्यांच्याकडे सीओओ पदाची जबाबदारी होती. तसेच, व्होडाफोन-आयडियाने सांगितले की, बालेश यांनी संयुक्त व्यवसायाची रणनीती तयार होण्यापासून चालविली आहे.

रवींद्र टक्कर हे सध्या व्होडाफोन-आयडिया आणि इंडस टॉवरचे बोर्ड मेंबर आहेत. शिवाय भारतातील व्होडाफोन समूहासाठी देखील ते जबाबदार आहेत. २०१७ पासून ते या पदावर आहेत. सध्याच्या त्यांच्यावरील जबाबदारी पूर्वी ते व्होडाफोन रोमानियाचे तीन वर्षे सीईओ आणि लंडनमध्येही व्होडाफोन पार्टनर मार्केटचे सीईओ होते. ते १९९४ पासून व्होडाफोन समुहामध्ये आहेत. शिवाय मागील २५ वर्षांमध्ये व्होडाफोनच्या ऑपरेटिंग कंपन्यांमध्ये अनेक ठिकाणी नेतृत्वाच्या पदांवरील कामाचा त्यांना टेलिकॉम क्षेत्रातील अनुभव आहे.