वॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा अध्यक्षीय उमेदवारी देण्याचे अंतिम सोपस्कार पार पाडण्यासाठी उत्तर कॅरोलिनातील शार्लट येथे रिपब्लिकन पक्षाचे अधिवेशन २१ ते २४ ऑगस्टला होत असून त्यात त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्यासाठी एकूण ३३६ प्रतिनिधी मतदान करणार आहेत. एरवी अशा अधिवेशनाचा खूप गाजावाजा करून उमेदवारी जाहीर केली जात, पण यावेळी फ्लोरिडात करोनाचा प्रसार जास्त असल्याने हे अधिवेशन साधेपणाने पार पाडले जाणार आहे. त्यासाठी पत्रकारांना प्रवेश दिला जाणार नाही.

रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या अधिवेशनातील सार्वजनिक कार्यक्रम आधीच रद्द करण्यात आले असून ३३६ प्रतिनिधी शार्लट येथील अधिवेशनास येऊन मतदान करतील. करोनामुळे असलेल्या निर्बंधामुळे गर्दी टाळण्याकरिता त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. २१ ते २४ ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन पार पडणार असले तरी त्यातील मुख्य कार्यक्रम २४ ऑगस्टला होणार आहे. पण त्यासाठी प्रसारमाध्यमांना बंदी घालण्यात आली. एकूण पाचशे अधिकृत प्रतिनिधींच्या वतीने ३३६ प्रतिनिधी गुप्त मतदान करणार आहेत. इतर प्रतिनिधी व पाहुणे यांना आधीच  प्रतिबंध करण्यात आला आहे. स्थानिक व राज्य प्रशासनाने करोनामुळे घातलेल्या निर्बंधामुळे प्रतिनिधींनाही जाण्यायेण्यात अडचणी येणार आहेत. एरवी पत्रकारांना जमवून या अधिवेशनाचा गाजावाजा करीत अध्यक्षीय उमेदवारी जाहीर होते पण तसे यावेळी होणार नाही. जर हा निर्णय अमलात आला तर प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीशिवाय होणारे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे.