पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी शेवटी भाजपला धडा शिकवलाच. लोकांना गृहित धरण्याची वृत्ती अंगाशी आली.

भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणालाही फटका बसला आहे. शेतकऱ्यांनीही  भाजपला धडा शिकविला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप सरकारच्या धोरणांच्या विरोधात जनजागृती सुरू केली आहे. त्यालाही लोकांनी पाठिंबा दिल्याचेच निकालांवरून स्पष्ट होते.

राफेल विमानाच्या खरेदीबाबत मोदी सरकार गुप्तता पाळत आहे. ही गुप्तता का पाळली जाते याचे उत्तर दिले जात नाही. मतदारांनी या मुद्दय़ावरून भाजपला उत्तर दिले आहे. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याचे आश्वासन दिले जाते. प्रत्यक्षात देशाच्या सर्वच भागांतील शेतकरी वर्ग नाराज आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी भाजपला योग्य ते उत्तर दिले आहे. राफेल, शेतकरी वर्गाचे प्रश्न यावरून लक्ष विचलित करण्यासाठी धार्मिक मुद्दय़ांचा आधार भाजपने घेतला होता. पण धर्माच्या आधारे मते मिळविण्याचे दिवस  संपले आहेत.

सीबीआयमध्ये काय चालले आहे हे तर देशाने बघितले. रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्‍‌र्हनरनी राजीनामा दिला. देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात सर्व यंत्रणांची स्वायत्तता जपली जात होती. पण नेमका उलटा प्रवास भाजप सरकारच्या काळात सुरू आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात काँग्रेसने कधीही पातळी सोडली नव्हती. पण पंतप्रधान मोदी किंवा भाजपच्या अन्य नेत्यांची भाषणे बघितल्यास ते कोणत्या थराला गेले हे बघायला मिळाले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निकालांनी योग्य तो संदेश गेला आहे. लोकसभा निवडणुकीत याचीच पुनरावृत्ती होईल.

– रणदिपसिंग सूरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते