जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) अज्ञातांकडून झालेल्या हल्ल्यानंतर त्याचे पडसाद आता देशभर उमटले आहेत. ठिकठिकाणी विद्यार्थ्यांकडून या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी चोवीस तासात गुन्हेगारांना पकडा आणि शिक्षा द्या अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.

चिदंबरम म्हणाले, आमची मागणी आहे की, सरकारने जेएनयूत हिंसाचार घडवून आणणाऱ्या गुन्हेगारांना चोवीस तासांच्या आत पकडावे. पीडितांना न्याय मिळवून द्याा. त्याचबरोबर या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि त्यावरही त्वरीत कारवाई करावी.

देशाच्या राजधानीत ही घटना घडली आहे. केंद्र सरकार, गृहमंत्री, नायब राज्यपाल आणि पोलीस आयुक्त यांच्या थेट निगराणी खाली असलेल्या देशातील आघाडीच्या विद्यापीठात घडलेली ही घटना घडणे म्हणजे आपण आता आराजकतेकडे झुकत असल्याचे प्रतिक आहे.

आणखी वाचा – JNU Violence: जेएनयूमध्ये हल्ल्याचा रचला गेला कट; कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप

अलीकडील काळात आपण पाहिलेले हे अत्यंत धक्कादायक कृत्य आहे. यापेक्षा अधिक धक्कादायक आणि लाजिरवाणे काहीही असू शकत नाही, असे चिदंबरम म्हणाले. अशी घटना घडणे हे दिल्ली पोलिसांवर संशय उपस्थित करणारे आहे.