माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया देताना, आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात आमच्याविरोधात चुकीचे खटले दाखल करण्यात आले होते, असे म्हटले आहे.

आम्ही कधीच सूडबुद्धीने वागलो नाही, मात्र काँग्रेस सरकारच्या काळात जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते, तेव्हा माझ्याविरोधात चुकीचे खटले दाखल केले. एवढेच नाहीतर त्यांनी मोदीजी आणि अमित शहा यांच्याविरोधातही चुकीचे खटले दाखल केले होते. नंतर आम्हा सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. चिंदबरम यांच्या विरोधात असलेल्या खटल्याती पुरावे आहेत. तपास सुरू आहे. सध्या प्रकरण न्यायालयात आहे, त्या ठिकाणीच यावर निर्णय होईल. असे गडकरी यांनी माध्यमाशी बोलातना सांगितले.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन दिला आहे. आता ईडीच्या गुन्ह्यातही त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.